रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती आधीच आहे त्यात आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई लोकल पुन्हा बिघडली. आज ठाणे मुलुंड स्थानकात सकाळी ओव्हरहेड वायरवर कापडाचा तुकडा अडकल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. ते सुरळीत होण्यापूर्वीच कांजूर ते भांडूप दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटी ते ठाणे संपूर्ण लोकल सेवाच विस्कळीत झाली आहे. सुरुवातीला एक ते दीड तास लोकल उशिराने धावत होत्या.
पहिल्याच दिवशी ऑफिसला लेट मार्क आणि त्यात होणारा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. वैतागलेल्या प्रवाशांनी अखेर ट्रेनमधून उतरून रुळावरून चालायला सुरुवात केली आहे. साडेचार तास उलटूनही अजूनही मध्य रेल्वे रुळावर परतलेली नाही. अजूनही अर्धा ते पाऊण तास उशिराने गाड्या धावत आहेत. मध्य रेल्वेकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. प्रवासी आता कसेबसे ऑफिसला पोहोचले मात्र आता घरी कसं जायचं हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आहे.
