नवी मुंबईतील तळोजा फेज-२ परिसरातुन एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक घटना समोर आली आहे. लिफ्ट मेंटेनन्सचे कंत्राट मिळवण्यावरून आणि जुन्या आर्थिक व्यवहारांच्या वादातून झालेल्या वादानंतर थेट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात विशाल शिंदे आणि सचिन डांगे हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी पाच नामनिर्दिष्ट आरोपींसह तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, संबंधित व्यक्ती यापूर्वी भागीदारीत लिफ्ट मेंटेनन्सची कामे आणि कंत्राटे घेत असत. मात्र, जुन्या आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे भागीदारीत फूट पडली. त्यानंतर पुन्हा लिफ्ट मेंटेनन्सचे कंत्राट मिळवण्यावरून त्यांच्यात वाद टोकाला गेले होते.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास विशाल शिंदे, सचिन डांगे आणि सौरभ डुंबरे हे तिघे जण तळोजा फेज-२ मधील शिवाजी चौकाजवळ असलेल्या मारवा इमारतीखाली उभे होते. यादरम्यान आरोपी तिथे आले आणि त्यांच्यात पुन्हा कंत्राट व जुन्या व्यवहारांवरून बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी पूर्वनियोजित प्लॅननुसार लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने तिघांवर बेदम हल्ला चढवला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पिस्तुलातून थेट गोळ्या झाडल्या. या अचानक झालेल्या गोळीबारात विशाल शिंदे आणि सचिन डांगे यांना गोळ्या लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले.
